SINDEWAHI : वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर सरपंचाचे उपोषण मागे!

0

गावगुंडांपुढे व्यवस्थेचे मौण, त्रासाने पत्करला उपोषणाचा मार्ग..

SINDEWAHI | 13 JUNE 2024
तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप बाबुराव ठाकरे यांनी गावगुंडाकडून ग्रामपंचायतीच्या कचरा कुंड्या, मालमत्तेची तोडफोड, वारंवार धमक्या व झालेले प्राणघातक हल्ले या विरोधात पोलीसांत तसेच पंचायत समिती स्तरावर लिखित तक्रार देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने कालपासून त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. 
याची माहिती मिळताच आज ब्रम्हपुरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना राज्याचे विरोधी पक्ष नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपोषण मंडपास भेट देऊन सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत संबंधित विभागांना तात्काळ चौकशी करून कारवाईचे निर्देश दिले. 
वडेट्टीवारांच्या आश्वासनानंतर सरपंच ठाकरे यांनी निंबूपाणी पीत सदर उपोषण उपोषण मागे घेतले.


आपले गाव स्वच्छ व सुंदर तसेच निरोगी राहावे याकरिता सिंदेवाही तालुक्यातील मरेगाव (तुकुम) येथील सरपंच संदीप ठाकरे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत गावात कचराकुंड्या तयार केल्या. मात्र गावातील काही समाजकंटकांनी त्याची तोडफोड केली. सोबतच गावातील मुख्य पाणंद रस्त्यावरुन वाळू वाहतूक करणारे अवजड वाहने जाऊन रस्त्याची दुर्दशा करण्यात आली. या विरोधात आवाज उठवणाऱ्या सरपंच संदीप ठाकरे यांचेवर सलग दोनदा प्राणघातक हल्ला झाला. 
या सर्व गंभीर प्रकरणाची पंचायत समिती तसेच पोलीसांत वारंवार तक्रार करूनही कोणत्याही प्रकारची चौकशी किंवा कारवाई होत नव्हती; अखेर न्यायासाठी सरपंच ठाकरे यांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. 
त्यांनी कालपासून सिंदेवाही पंचायत समिती तथा तहसील कार्यालय परिसरात आमरण उपोषण सुरू केले. 
याची माहिती मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या मतदारसंघातील दौऱ्यादरम्यान सिंदेवाहीत सदर उपोषण मंडपाला भेट दिली व सरपंच संदीप ठाकरे यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या मागण्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यावर समाधान व्यक्त करीत उपोषणकर्ते मरेगाव (तुकुम)चे सरपंच संदीप ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेहस्ते लिंबू पाणी घेऊन उपोषण मागे घेतले.


यावेळी तहसीलदार पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण, पंचायत समितीचे अधिकारी, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, माजी पं.स. सदस्य राहुल पोरेड्डीवार, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष राहुल बोडणे, कृ.उ.बा.स. चे संचालक नरेंद्र भैसारे, जानकीराम वाघमारे, सचिन नाडमवार यांचेसह आदिंची उपस्थिती होती.

विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या तत्परतेने तुर्तास ठाकरेंचे उपोषण स्थगित झाले असले तरीही, गावच्या सरपंचालाच व्यवस्थेला कंटाळून उपोषणास बसावे लागते हे अतिशय खेदजनक असून यामुळे पुन्हा एकदा सिंदेवाही तालुक्यातील प्रशासकीय व पोलीस व्यवस्था कुचकामी असल्याचे दिसून येते, अशी शोकांतिका नागरीकांमध्ये चर्चिल्या जात आहे. 

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !