SINDEWAHI । 15 JUNE 2023
सद्या खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लाकडं आणण्यासाठी गावाशेजारील जंगलात गेलेल्या तिघा शेतकऱ्यांपैकी एकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची दुर्दैवी घटना सिंदेवाही (sindewahi) वनपरीक्षेत्रातील चिटकी बिटात घडली.
रघुनाथ नारायण गुरनूले (३५) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही तालुक्यातील नवेगाव-लोनखैरी येथील तीन शेतकरी शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांसाठी लाकूडफाटा आणण्यासाठी गावाशेजारील जंगलात गेले असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने तिघांपैकी रघुनाथ नारायण गुरनूले यांचेवर अचानक हल्ला चढवला. (tiger Attack) या हल्ल्यात ते जागीच ठार झाले. त्यामुळे घाबरलेल्या इतर दोघांनी घटनास्थळावरून धुम ठोकून गावाच्या दिशेने पळ काढला. गावात येऊन गावकऱ्यांना आपबीती सांगितली. घटनेची माहिती वनविभाग व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांना देऊन गावकर्यांनी जंगलात धाव घेतली. परंतु घटनास्थळापासून ३० ते ४० मिटर अंतरावर मृतदेह आढळून आला.
त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सिंदेवाहीकडे पाठविले. या दुर्दैवी घटनेमध्ये घरचा कमविता पुरुषचं गेल्याने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत रघुनाथच्या पश्चात पत्नी, आईवडील व मुलगा असा परिवार आहे.