जमिन एकाची, फेरफार दुसऱ्याच्या अन् रिसॉर्ट तिसऱ्याचा!
SINDEWAHI । 18 JUNE 2023
तालुका मुख्यालयापासून १४ की. मी. अंतरावर आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जाण्यासाठी असलेल्या पांगडी गेटजवळील कुकडहेटी गावहद्दीत फुटप्रिंट जंगल रिसॉर्ट (Footprint Jungle Resort) नावाने एक आलिशान रिसॉर्ट आहे. परंतू हे रिसॉर्ट आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील मौजा कुकडहेटी गट क्र. ५७ क्षेत्र ५०९, २९३ चौ.की.मी. या आदिवासींच्या जागेचे खोटे कागदपत्र तयार करून संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना भुलथापा देऊन अंधारात ठेवत त्यांच्या जागेवर फुटप्रिंट जंगल रिसॉर्ट नावाने आलिशान रिसॉर्ट बांधल्याने या गंभीर प्रकरणाची चौकशी करून आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिसच्या वतीने विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
तालुक्यातील रामा संबा सोनवाने, गंगाधर संबा सोनवाने, दामा संबा सोनवाने व देवराव संबा सोनवाने हे आदिवासी (माना) कुटुंबीय मोहाळी येथे वास्तव्यास राहतात. त्यांच्या वडीलांनी म्हणजेच संबा सोनवाने यांनी मौजा कुकडहेटी येथील खसरा क्र. १८७/१ व १८३/३ आराजी १ हेक्टर जमिन १ जुलै १९५५ रोजी रजिस्ट्री विक्रीपत्रानुसार भिकाऱ्या वल्द कुसना माना (रा. मोहाळी नलेश्वर) यांचेकडून खरेदी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत संबा माना व त्यांचे अपत्ये या जमिनीवर शांततामय वहिवाट करत होते.
परंतू ब्रम्हपुरी येथील भारत देवीदास गणवीर यांनी गट क्र. ५७ क्षेत्र ५०९, २९३ हा भुखंड आपल्या मालकीचा नसून सुद्धा खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारावर गट क्र. ५७ च्या आराजी मध्ये सामावून घेत भूमिलेख विभागाला हाताशी धरून सदरहू गटाचे मोजमाप करून घेतले. परंतू चतुर्सिमाधारक शेतकऱ्यांना रीतसर नोटीशी दिल्या नाही आणि त्या शेतजमिनीचे चुकीचे मोजमाप करून शेतजमीन बळकावून घेतली. या गंभीर प्रकरणाची दखल घेत रामा सोनवाने यांनी तहसिलदार सिंदेवाही यांचेकडे आक्षेप अर्ज सादर केला परंतू तहसीलदार यांनीही कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.
आणि तिकडे गणवीर यांनी गट क्रं.५७ मध्ये सन २०१६-१७ या सालीच रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण करून टाकले. तर जंगलू फागो घरत रा. अंतरगाव ता. सिंदेवाही यांनी सुद्धा सोणवाने यांच्या अज्ञानतेचा फायदा उचलून सदर गट क्रं. २८८ मधून १ हेक्टर जमीन माझ्या मालकीची आहे असे दाखवून महसूल विभागाच्या अधिकांऱ्यासोबत संगणमत करून दि. ०५ जानेवारी १९६८ रोजी कवडू सुकरू मानकर याला विक्री दर्शवून फेरफार क्रं. २३ नुसार दि. १० जून १९७९ फेरफार केल्याची नोंद करून दिली. परंतू सिंदेवाही तहसील कार्यालयात यासंदर्भात रेकार्डला फेरफार वहीवर नोंदच नाही. तरीही जंगलू फागो घरत यांनी कवळू सुकरू मानकर यांना परस्पर शेतजमीन विकली व फेरफार पंजी करून घेतलीच कशी? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
गट क्रं. २८८ या शेतजमिनीची विक्री झालीच नाही. आणि भारत गणवीर यांचेकडून जागा विक्रीसंदर्भाचा जाहीरनामा व बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी दि. २५ आक्टोंबर २०१६ रोजी तलाठी साजा क्रं.१० या कार्यालयात जाहीरनामा प्रसिद्ध केला.
त्या जमिनीचा सात बारा स्वतःच्या नावे नसताना सुद्धा
गणवीर यांनी शासकीय आशिर्वादाने शेती अकृषक करून घेतली आणि सदर जागेवर फुटप्रिंट जंगल रिसॉर्ट या रिसॉर्ट चे बांधकाम पूर्ण करून सन २०१८ ला व्यवसायिक कामही सुरु केले.
त्यानंतर जागेचा शेवटचा फेरफार दि. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी करून सातबारा आपल्या नावाने करवून घेतला. ही बाब शासन व प्रशासनाचा कुंभकर्णी झोपेचे मोठे उदाहरण म्हणून पुढे येत आहे.
सोणवाने या आदिवासी कुटुंबीयांच्या जमीनीवर डल्ला मारणाऱ्या ब्रम्हपुरीच्या गणवीरकडे सदर जमीनीच्या संदर्भात कोणतेही मूळ कागदपत्रे नसताना सुद्धा त्याला ही जागा आपल्या नावे करण्यापासून तर त्या जागेवर रिसॉर्ट बांधेपर्यत नगर रचनाकार चंद्रपूर, ग्रामपंचायत कुकडहेटी, उपसंचालक (बफर) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) चंद्रपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी जि. प. चंद्रपूर, कार्यकारी अभियंता रो. ह. यो. (सा. बां.) जि. प. चंद्रपूर, कार्यकारी अभियंता चंद्रपूर पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता म. रा. वि. वि. कं. लि. ब्रम्हपुरी या प्रशासनातील कार्यालयांनी नाहरकत प्रमाणपत्र बहाल केलीच कशी हा प्रश्न मात्र तालुक्यातील जनतेला सुटता-सुटत नाहीये.
त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून आदीवासी प्रतिबंधक कायद्यानुसार खोटे कागदपत्राच्या आधारे शेतीचे भूखंड हडप करणाऱ्या व करवून देणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी तसेच भारत गणवीर यांच्या नावाने झालेला फेरफार रद्द करून तो सातबारा सोणवाने यांच्या नावाने पूर्ववत करून द्यावा अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिसच्या वतीने विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.