सोसायटी फॉर फास्ट जस्टिसची चौकशीची मागणी..
GADCHIROLI। 06 JUNE 2023
वनविभागाकडून (Mahaforest) जंगल कामगार संस्थाना देण्यात येणारा अनुदान निधी लाटण्यासाठी संस्थांच्या नावे खोटी कागदपत्रे तयार करून लेखा परीक्षणाचा खोटा अहवाल शासनदरबारी सादर केल्याचा गंभीर प्रकार गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आला आहे.
जिल्ह्यातील जंगल कामगार संघाच्या कार्यकारी मंडळ सचिव व लेखा परीक्षकाने हा महाप्रताप केल्याचे आता निष्पन्न झाले असून संबंधितांची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टिस (विदर्भ) च्या वतीने जिल्हाधिकारी तसेच मुख्य वनसंरक्षक यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.
गडचिरोली जिल्हा जंगल कामगार सहकारी संघात २६ जंगल कामगार संस्था कार्यरत आहेत. या जंगल कामगार संस्थांना शासननिर्णयानुसार १०% कल्याणकारी निधीचे सभासदांना वाटप करून वनविभागाला अहवाल सादर करणे अनिवार्य असते.
परंतू तसे न करता गडचिरोली जिल्हा जंगल कामगार संघाचे अध्यक्ष, माजी आमदार हरिराम आत्माराम वरखडे तसेच सचिव प्रकाश झाडे यांनी वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून जिल्ह्यातील जंगल कामगार संस्था सभासदांच्या कल्याणासाठी दिलेला शासननिधी नियमबाह्य पद्धतीने बळकावून फस्त केला.
हे महाभाग इतक्यावरच थांबले नाहीत तर संस्थेच्या मय्यत सभासदांच्या खोट्या स्वाक्षऱ्या व अंगठे मारून शासनाच्या डोळ्यात धूळफेक केली. संघाच्या अनेक कर्मच्याऱ्यांना एकाच दिवशी दोनदा काम केल्याचे कागदोपत्री दाखवून लाखो रुपयाची उचल केली.
या गैरव्यवहाराबाबत संघाचे तत्कालीन सचिव मंगलसिंग ढिवरू मेश्राम यांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पदावरून पायउतार केल्या गेले. त्यामुळे आपल्या कर्तव्यात कसूर करून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच भ्रष्टाचारास खतपाणी घालणाऱ्या वनविरोधी कंटकांवर उचित फौजदारी कारवाई होणे गरजेचे आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन प्रकरणाच्या खोलात शिरण्यासाठी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ) चे जिल्हाध्यक्ष अरुण माधेशवार यांनी माहीती अधिकार कायद्यांतर्गत शासनस्तरावर पाठपुरावा केला. परंतू चुकिची माहिती सादर करून अधिकाऱ्यांनी हात झटकले. त्यामुळे दि. १९ मे २०२३ रोजी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी, जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक तसेच जिल्हा उपनिबंधक यांना पुराव्यानिशी तक्रार देऊन जिल्ह्यातील जोगीसाखरा, मुरूमगाव, बेलगाव, कोटगल, जांभडी, फुलबोडी, पेंढरी, कसूरवाही, वडसा खुर्द, वैरागड, पावीमुरांडा, भूमखंड, महावाडा, धानोरा, व खुटगाव या जंगल कामगार संस्थांची तसेच संघाचे अध्यक्ष हरिराम वरखडे आणि सचिव प्रकाश झाडे यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ ) ने केली आहे.