पात्र ८० विद्यार्थ्यांपैकी २७ विद्यार्थी एकट्या सिंदेवाहीचे...
SINDEWAHI । 27 JUNE 2023
जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून सिंदेवाही तालुक्याने जिल्ह्यामध्ये निकालात अव्वल स्थान पटकावले आहे.
तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.
या यशाबद्दल चंद्रपूर जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.
नुकत्याचं जाहीर झालेल्या जवाहर नवोदय परीक्षेला बसलेल्या पात्र ८० विद्यार्थ्यांपैकी २७ विद्यार्थी एकट्या सिंदेवाही तालुक्यातील असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मागील एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी सिंदेवाही तालुक्याच्या दौरा केला असता, त्यांनी जवाहर नवोदय परीक्षेत मागील सहा वर्षापासून परंपरा कायम राखलेली मोहाळी (नले.) केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकडहेटी येथे भेट देऊन सराव वर्गाची पाहणी केली. त्यावेळेस त्यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करून जिल्हा व तालुका प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना शुभेच्छा ही दिल्या होत्या. त्यावेळी गटविकास अधिकारी अक्षय सुक्रे व गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे हे उपस्थित होते.