नार्ड एज्युकेशन इंस्टीट्युट इंटरनॅशनल अमेरिकन बेस्ट प्रा. लि. मुंबई या बोगस संस्थेचा पराक्रम!
आरमोरी पोलीसांचा तपास कासवगतीने...
GADCHIROLI । 12 JUNE 2023
जिल्ह्यातील आरमोरी येथील रहिवासी नारायण बाबुराव धकाते यांना नौकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांनी लुबाडल्याची तक्रार आरमोरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. परंतू नऊ-दहा महीने उलटूनही गुन्हेगारांचा छळा लावण्यात आरमोरी पोलीसांना यश आले नाही.
नार्ड एज्युकेशन इंस्टीट्यूट इंटरनॅशनल अमेरिकन बेस्ट प्रा. लि. मुंबई (mumbai) या कंपनीत जिल्हा व्यवस्थापक या पदावर नौकरी लावून देतो असे सांगत नारायण धकाते यांना भामट्यांनी फसविल्याचे प्रकरण दिर्घावधीपासून न्यायासाठी आस लावून बसला आहे.
नागभिड (जि. चंद्रपूर) येथील संजय आसाराम कुथे व राहुल दयाराम पांडव यांच्या माध्यमातून २०१९ मध्ये मुंबई येथील राम अण्णाजी घाटे, राजेश शेगोकार मुंबई, अशोक पंजाबराव वलके अमरावती, श्रेया शेट्टी (पाठक ) मुंबई व निलेश लक्ष्मण मांडवगडे अमरावती या सर्वांनी आरमोरी येथील नारायण बाबुराव धकाते यांना नार्ड एज्युकेशन इंस्टीट्यूट इंटरनॅशनल अमेरिकन बेस्ट प्रा. लि. मुंबई या बोगस कंपनीत जिल्हा व्यवस्थापक या पदावर चाळीस हजार रुपये पगार व इतर सोयी सुविधांची नौकरी लावून देण्यासाठी तीन लाख रुपये जमा करण्याची मागणी केली.
यासाठी त्यांनी धकाते यांना मुंबईत रेगस १५ देव कॉपोरा कॅटबरी जंक्शनजवळ इस्टर्न एक्सप्रेस हायवे जि. ठाणे येथे कंपनीचे मुख्य कार्यालय आहे अशी माहिती देत एक लाख रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला नियुक्तीपत्र (appointment letter) देण्यात येईल असे सांगितले. त्यामुळे चांगल्या पगाराच्या नौकरीच्या आशेने दि. २५ जुलै २०१९ रोजी नारायण धकाते यांनी दीड लाख रुपये त्यांच्या मुंबई येथील ICIC बँकेच्या खाते क्रं. 340805000160 यावर जमा केले. आणि डिजिटल पेमेंट (Phone Pay) च्या माध्यमातून वेळोवेळी पन्नास हजार, एकोणपन्नास हजार आणि नव्यान्नव हजार रुपये अशी वेगवेगळी उर्वरित रक्कम ही जमा केली.
त्यानंतर या कंपनीने स्वतःचे कागदपत्रे व नियुक्ती पत्र दिले. आणि गडचिरोली येथील विलास बल्लमवार यांचा श्री साई अपार्टमेंटमधील फ्लॅट १० हजार रुपयांनी किरायाने घेण्यात आला.
त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात सहाय्यक व्यवस्थापक व लिपिक या पदावर नवीन नियुक्ती करण्यासाठी मुंबईच्या दै. लोकमत वृत्तपत्रामध्ये दि. १४ ऑगस्ट २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
त्या जाहिरातीनुसार दि. १८ ऑगस्ट २०१९ रोजी गडचिरोली येथील कार्यालयात संबंधितांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये ०८ तालुका व्यवस्थापक आणि लिपिक पदाकरीता निवड करण्यात आली आणि त्यांना दि. १७ सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
आणि २५ सप्टेंबर २०१९ पासून कंपनीच्या कामाला सुरवात झाली. परंतू अल्पावधीतच सदर कामामध्ये अडचण निर्माण होत असल्याने स्थानिकांनी संबंधित वरीष्ठांना विचारपूस केली तथापि उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आणि काही कालावधीतच वरीष्ठांनी स्वतःचे फोन बंद केले. त्यामुळे या बोगस कंपनीचे घबाड उघडकीस आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नारायण धकाते यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि आरमोरी पोलीसांकडे दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी या बोगस संस्थेविरोधात लेखी तक्रार दाखल केली. परंतू आरमोरी पोलीसांनी कोणत्याच प्रकारचा गुन्हा नोंदवून साधी चौकशी ही राबविली नाही. त्यामुळे नारायण धकाते यांनी दि. १३ ऑक्टोंबर २०२२ रोजी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ ) कडे लेखी पुराव्यानिशी तक्रार सादर करून न्यायाची अपेक्षा केली. त्या अनुषंगाने सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ ) ने तातडीची भुमिका घेत दि. १७ ऑक्टोंबर २०२२ रोजी राज्याचे गृहसचिव, पोलीस महासंचालक, पोलीस उपायुक्त, विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचेकडे तक्रार सादर करून या प्रकरणाची गंभीरता निदर्शनास आणून दिली. त्यामुळे दि. २४ नोव्हेंबर २०२२ रोजी वरिष्ठांची कोपरखळी बसताच कुंभकर्णी अवस्थेत झोपलेल्या आरमोरी पोलीसांनी जागे होत नारायण धकाते यांच्या तक्रारीवरून ०३ डिसेंबर २०२२ रोजी ला भादंवि १८६० अन्वये ४२०, ४६८, ४७१ व कलम ३४ नुसार नार्ड एज्युकेशन इंस्टीट्यूट इंटरनॅशनल अमेरिकन बेस्ट प्रा. लि. मुंबई या बोगस संस्थेवर गुन्हा दाखल केला. परंतू आज पाच ते सहा महिने लोटूनही या प्रकरणाच्या तपासाला गती येत नाही. त्यामुळे आरमोरी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बोगस कंपन्या स्थापन करून राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील होतकरू व सुशिक्षित तरूणांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडण्याचे प्रकार हल्ली सर्रासपणे सुरू आहेत. अशात पद्धतीने नजीकच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेकांना बनावट नियुक्तीपत्र देऊन गंडवले होते.तसेच चंद्रपूरातील निलेश तराळे या हलाखीची परिस्थिती असणार्या निराधार तरुणाला सुद्धा बोगस नौकरी-नियुक्तीच्या नादाने लाखो रुपये गमवावे लागले. या संदर्भातही स्थानिक रामनगर पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांत अशा बनावट संस्थांच्या नावाने गोरगरिब सुशिक्षित तरूणांची लाखो रुपयांनी लूट करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे या संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोसायटी फॉर फास्ट जस्टीस (विदर्भ ) ने केली आहे.