दोन महिन्यातील सहावी घटना..
CHANDRAPUR। 27 Feb 2023
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या (tadoba andhari tiger reserve) बफर झोन (buffer zone) मध्ये झालेल्या वाघांच्या झुंजीत (tiger fights) एका पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना काल रविवारी सायंकाळी उघडकीस आली आहे.
आज त्या वाघाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले. मागील दोन महिण्यात तब्बल सहा वाघांचे मृत्यू झाल्याने ताडोबा व्यवस्थापनाच्या चिंतेत भर पडली आहे.
वनाधिकाऱ्यांनी या वाघाचा मृत्यू झुंजीदरम्यान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. दिवसागणिक ताडोबा व त्याबाहेर वाघांच्या झुंजीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वारंवार या झुंजी कशा होतायत? आणि त्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येईल? असे प्रश्न ताडोबातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये वनविभागाचे पथक गस्त करीत असताना काल (रविवारी) सायंकाळच्या सुमारास पूर्ण वाढ झालेला वाघ चक निंबाळा गावाजवळ मृतावस्थेत आढळून आला. मृत वाघाच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. हा वाघ आधीपासून जखमी असावा, असाही अंदाज बांधण्यात येत आहे. तसेच त्याच्या शरीरावर असलेल्या जखमांवरून दोन वाघांमध्ये अधिवास क्षेत्रावरून झालेल्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. वाघाच्या मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह चंद्रपूर येथील उपचार केंद्रात (TTC) येथे आणण्यात आला. आणि आज (सोमवारी) सकाळी टीटीसी केंद्रामध्ये या वाघाच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले.
मागील दोन महिण्यात चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) ६ वाघांचा मृत्यू झाला आहे. ०३ जानेवारी रोजी ब्रम्हपुरी तालुक्यात एका शेतातील विहिरीत वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. ४ जानेवारीला सावली रेंजमधून सुटका करण्यात आलेल्या वाघिणीचा १४ जानेवारीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर शेतात विजेचा धक्का लागून वाघिणीचा मृत्यू झाला होता. १४ जानेवारीच्या रात्री भद्रावती क्षेत्रांतर्गत माजरी येथे, तर ५ फेब्रुवारी रोजी पोंभुर्णा क्षेत्रामधील घोसरी बीट अंतर्गत शेतात एका वाघाचा मृत्यू झाला होता, त्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या एका वाघाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. १२ फेब्रुवारी रोजी वरोरा क्षेत्राच्या सीमेवरील पोथरा नदीच्या पात्रात वाघाचा मृतदेह तरंगतांना आढळून आला होता. अशा एकुण ६ वाघांचा दोन महिन्यांच्या आत मृत्यू झाल्याने वनविभागाच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे.
ताडोबा व परिसरात वाघांच्या झुंजीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून अधिवास क्षेत्रातच ह्या घटना घडत असल्याने भविष्यात या घटनांना आळा घालण्यासाठी यशस्वी उपाययोजना आव्हान वनविभापुढे आहे.