▪️शेतकरी वनविभागाच्या ताब्यात..
CHANDRAPUR। 06 Feb 2023
रानडुक्करांच्या हैदोसापासुन शेतात लागवड केलेल्या चना पिकाचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या विद्युत तारांना पट्टेदार वाघाचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
या घटनेत एका बावीस वर्षीय युवा शेतकऱ्याला वनविभागाने ताब्यात घेतले आहे. अंकूश पुनाजी नाहगमकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. आज सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वाघाचा (tiger) मृतदेह आढळला होता.
पोंभूर्णा वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात सर्व्हे नंबर 316 मध्ये अरूण म्हलारी मसारकर यांची चार एकर शेती आहे. ही शेती येथिलच अंकूश पुनाजी नाहगमकर हा शेतकरी भाडेतत्वावर कसत होता. सोयाबीनचे पीक घेतल्यानंतर रब्बीचे पीक म्हणून चार एकरामध्ये चणा पेरलेला आहे. रानडुकरामुळे पीकाचे नुकसान होवू नये म्हणून सभोवताल काटेरी तारेचे कम्पाउंड उभारले आहे.
या काटेरी तारांमधून रात्रीच्या वेळेस वन्यप्राणी आत जावू नये म्हणून त्याला जिवंत विद्युत तारा प्रवाहित करण्यात आल्या होत्या. शेतातील विद्युत तारा प्रवाहित असताना पट्टीदार वाघाचा त्या तारांना स्पर्श होऊन शॉक लागला. त्यातच वाघाचा मृत्यू झाला. सोमवारी दुर्गंधी सुटल्यानंतर गावकऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतल्यानंतर त्यांना वाघ मृतावस्थेत आढळून आला. वनविभागाने घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि वाघाच्या मृत्यूचे कारण शोधले असता धक्कादायक माहिती समोर आली. जिवंत विद्युत ताराच्या झटक्यामुळेच वाघाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या प्रकरणात 22 वर्षीय शेतकऱ्याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे.
सदर शेतकऱ्यांनी जिवंत विद्युत तारा वन्य प्राण्यांच्या संरक्षणाकरीता लावण्यात आल्याचे आणि त्या वाघाचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे.
दोन ते तीन दिवसांपूर्वीच वाघाचा विद्युत शाक मुळे मृत्यू झाल्याचेही माहिती समोर येत आहे नंतर वनविभाग व वन व पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले तसेच विद्युत विभाग इको प्रो आणि पशुवैद्यकीय विभागानेही घटनास्थळी जाऊन वाघाचा पंचनामा केला. मृत वाघास चंद्रपूर येथे आणण्यात आले आहे.