निधी वाटपात दूजाभाव नको - आढावा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना
CHANDRAPUR । 07Feb 2023
महाविकास आघाडी सरकारच्या काळात चंद्रपूर जिल्ह्याला विकासात्मक दृष्टिकोनातून अनेक जनकल्यानकारी योजनांना मंजुरी देत याकरिता मुबलक प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला. मात्र राज्यातील सत्तांतरानंतर जिल्ह्याच्या विकासाला खिळ लावण्याचा प्रयत्न चालवीला जात असून अनेक विकास कामांच्या शासकीय मान्यतांना रद्द करून नियमबाह्य अडथळे निर्माण केल्या जात आहे. मागील सरकारच्या काळात मंजूर झालेल्या सर्व विकास कामांना तातडीने प्रशासकीय मंजुरी प्रदान करून जिल्ह्याच्या विकास निधी वाटपात दुजाभाव करू नका अशा सूचना राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना दिल्या.
ते ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथील विस कलमी सभागृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा, उपजिल्हाधीकारी देशपांडे, मेश्राम, जि. प. मुख्यकार्यापलान अधिकारी विवेक जॉन्सन, तसेच वनविभाग,महसूल विभाग, बांधकाम विभाग, जि. प. बांधकाम विभाग, नगर प्रशासन विभाग, ब्रम्हपुरी, सिंदेवाही,सावली येथील सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना सूचना करताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की, ब्रह्मपुरी मतदार संघातील अनेक विकास कामे आजही प्रलंबित आहेत. याकरिता आपण सत्ता काळात अनेक योजनांना कार्यान्वित करण्यासाठी अथक प्रयत्न चालविले. यात ताडोबा पर्यटन व सफारी करिता कोट्यावधींच्या निधीची मंजुरी मिळवून दिली. सोबत ग्रामखेड्यांच्या विकासाकरिता जन सुविधा योजने अंतर्गत कोट्यावधींची कामे मंजूर केली. मात्र सत्तांतरानंतर जिल्ह्यात मंजूर झालेल्या विकास कामांना जाणीवपूर्वक ब्रेक लावल्या गेला असून कामांचे कार्यारंभ आदेश प्राप्तीनंतरही प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत. अशा सर्व मंजूर विकास कामांची चौकशी करून त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांना यावेळी दिल्या.
तसेच ब्रह्मपुरी मतदार संघातील मानव वन्यजीव संघर्ष यावर उपाय योजने करिता, वाघाची दहशत असलेल्या परिसरातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना संरक्षण भिंत, शेतकऱ्यांकरिता पाांदन रस्ते, वन्यजीव हल्ल्याच्या दहशतीत जगणाऱ्या गावांना संरक्षण कुंपण, ग्रामीण जनतेला मनरेगा अंतर्गत रोजगार, याकरिता मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. तथा ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही येथील नगरपंचायतीच्या विकास आराखडा बाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. सकारात्मक चर्चेअंती आढावा बैठकीची सांगता करण्यात झाली. यावेळी ब्रह्मपुरी मतदार संघातील नगरपंचायतचे पदाधिकारी, बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.