🎖️प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंदाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा!
🎭 यंदा झाडीपट्टीला बहुमान!
चंद्रपूर, दि. २५ जानेवारी २०२३.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंदाकडून आज पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच दिलेल्या योगदानाबद्दल त्या त्या व्यक्तींना केंद्र सरकार पद्म पुरस्कार जाहीर करत असते.
यंदाही पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ०१ पद्मविभूषण तर २५ पद्मश्री पुरस्कारांचा यात समावेश आहे. ओआरएसचे निर्माता दिलीप महालनोबिस यांना पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. तर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातून एक सुपरिचित नाव या यादीत आहे. ते म्हणजे झाडीपट्टीतील नाटकामध्ये निर्विवाद अधिराज्य गाजविणारे, जूनियर दादा कोंडके म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नाट्य कलावंत डॉ. परशुराम खुणे
झाडीपट्टी नाट्यरंगभुमीचे जेष्ठ कलावंत डॉ. परशुराम खुणे यांना कला विभागातून पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
डॉ. खुणे हे झाडीपट्टी रंगभूमीचे जेष्ठ विनोदी कलाकार असून त्यांनी आतापर्यंत ५००० हून अधिक नाटकांत ८००पेक्षा जास्त भूमिका साकारल्या आहेत.
गेली वर्षानुवर्षे पूर्व विदर्भातील जनतेची मनोरंजनात्मक सेवा करणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीच्या कलावंतास (Parshuram Khune) यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची ही बाब गडचिरोली जिल्ह्यासह संपुर्ण झाडीपट्टी नाट्यसृष्टीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी आहे.
कोण आहेत डॉ. परशुराम खुणे?
डॉ. परशुराम कोमाजी खुणे हे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मौजा गुरनोली या छोट्याश्या गावातून येतात. मागील ५० वर्षांंपासून त्यांनी झाडीपट्टी नाट्यसृष्टीची सेवा केली आहे.
गाजलेल्या भूमिका
परशुराम खुणे यांच्या 'एकच प्याला' नाटकातील तळीराम, 'सिंहाचा छावा' मधील शंखनाद, 'लग्नाची बेडी'तील अवधूत, या भूमिका अतिशय गाजल्या आहेत. यासोबतच 'लावणी भुलली अभंगाला'मधील गणपा भूमिकेतूनही त्यांनी नाट्यरसिकांची मने जिंकली आहेत.
पुरस्कार जाहीर होताच एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना डॉ. खुणे यांनी हा पुरस्कार झाडीपट्टीच्या रसिकांना समर्पित केला आहे.