▪️माजी मंत्री आ. वडेट्टीवारांच्या पत्राची कुलगुरूंकडून दखल
चंद्रपूर, दि. ३० जानेवारी २०२३.
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देवुन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव सिनेट मंडळाच्या वतीने 17 जानेवारी 2023 रोजी पारित केला. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील थोर हुतात्मे यांच्या नावांना बगल देऊन आदिवासी संस्कृती जतन करणे ऐवजी ती नामशेष करण्याचा जे षडयंत्र सिनेट मंडळाने रचले या विरोधात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वप्रथम पेटून उठत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी थेट गोंडवाना कुलगुरू यांना लेखी पत्रातून सज्जड इशारा देत स्व.दत्ता डिडोळकर यांच्या नावाला विरोध दर्शविला. यामुळे माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या पत्राची गंभीर दखल घेत गोंडवाना कुलगुरू यांनी अखेर विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.डिडोळकर यांचे नाव देण्याच्या ठरावाला स्थगिती दिली असून माजी मंत्री वडेट्टीवार यांच्या दणक्याने आदिवासी समाजाला व संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळाल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या मातीशी तीळमात्र ही संबंध नसलेल्या स्वर्गीय दत्ता डीडोळकर यांचे नाव गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला देण्याचा ठराव विद्यापीठाच्या सिनेट मंडळाने पारित करताच गडचिरोली जिल्ह्यातील संघटनांनी विरोध करण्यास सुरुवात केली. यातच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांची जन्मभूमी जरी चंद्रपूर जिल्ह्यातली असली तरी मात्र त्यांची कर्मभूमी ही गडचिरोली आहे. मंत्री असो वा आमदार चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रश्नांना घेऊन आजवर आ.वडेट्टीवारांनी आंदोलने करून तसेच विधानसभेत मांडून यशस्वीरित्या न्याय मिळवून दिला. दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी चा गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट मंडळाचा ठराव हा जिल्ह्याच्या आदिवासी संस्कृतीला नामशेष करण्याचे षडयंत्र असून आदिवासी समाजातील स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांशी आपल्या प्राणाची बाजी लावून लढणारे लढवय्ये योद्धा तथा थोर हुतात्मे क्रांतिवीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके व शहीद बिरसा मुंडा यांच्या नावाला बगल देणे म्हणजेच आदिवासी समाजातील थोर हुतात्म्यांचा हा अवमान असून पारित करण्यात आलेला ठराव हा आदिवासी संस्कृतीला जतन करण्याऐवजी नामशेष करणारा आहे. तसेच सदर ठराव अन्यायकारक असल्याचे कारणावरून माजी मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी पारित करण्यात आलेला ठरावाला चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वप्रथम कडाडून विरोध करत गोंडवाना कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांना लेखी पत्र देऊन तीव्र आंदोलनाचा सज्जड इशारा दिला.
सदर पत्राची गंभीर दखल घेत अखेर गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाच्या स्व.डीडोळकरांच्या नामकरण ठरावाला स्थगिती देण्यात आली असून माजी मंत्री, आ. वडेट्टीवार यांनी घेतलेली कणखर भूमिका याचे सर्व स्तरावरून स्वागत होत असून आदिवासी समाजातील बांधवांकडून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळवून दिल्याचे बोलले जात आहे.