सिंदेवाही, दि. २९ नोव्हेंबर २०२२.
गायरान जमिनीवरील अतिक्रमण हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा दुर्लक्षित प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सिंदेवाही तालुक्यातील ११ गावांतील गायरान जमिनी अतिक्रमणमुक्त करण्यासाठी तालुका प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.
त्यादृष्टीने तालुका पातळीवर जुने रेकॉर्ड तपासणीचे कामकाज सुरू झाले असून अनेकांना नोटिशीही प्राप्त झाल्यामुळे शासनाने आम्हाला दिलासा द्यावा, अशी मागणी तालुक्यातील अतिक्रमणधारकांनी केली आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गायरान जमिनीवर कच्चे व पक्के घरे बांधून वास्तव्य करणार्यांच्या यादीत अनुक्रमे जाटलापुर (तु), लोनवाही, कोठा (गुंजेवाही), मरेगाव (तु), आलेसुर, पेंढरी, नाचनभट्टी, अंतरगाव, सरडपार, किन्ही व चिटकी अशा अकरा गावांचा समावेश आहे.
यामध्ये कच्चे व पक्के घरे पकडून तालुक्यातील एकुण ३.२३ हेक्टर आर. जागेवरील सुमारे २५९ घरांवर बुलडोजर चालणार आहे.
त्यामुळे अतिक्रमणधारक नागरिकांची आता मोठ्या प्रमाणत धावाधाव होत असून आमदार, खासदार, अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे घालावे लागत आहेत.