लोकप्रतिनिधींना स्थानिकांचे साकडे!
सिंदेवाही, २८ नोव्हेंबर २०२२.
शासन आणि रस्ता हे दोन्ही चालण्यासाठी बनवले आहेत. सरकार चालत आहे, पण ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाल्याचे अनेक जागी निदर्शनास येते. त्यामुळे शासनकर्ते म्हणून गावातील खराब रस्त्यांवर जर लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने नजर ठेवली तर कदाचित त्यांनाही नवसंजीवनी मिळू शकेल. असेच गुंजेवाही - खैरी (चक) रस्त्याने येणाजाणार्या प्रत्येकाला वाटत असते.
सिंदेवाही तालुका मुख्यालयापासून जवळपास २२ कीमी. अंतरावर घनदाट जंगलात वसलेले खैरी चक हे छोट्या वस्तीचे पण ब्रिटिशकालीन तलावामुळे परीसरात सर्वपरिचित असे गाव!
खैरीला जाण्या-येण्यासाठी मुख्यतः मरेगाव-खैरी, गुंजेवाही-खैरी आणि पवनपार- खैरी अशी तीन रस्ते उपलब्ध आहेत. परंतू गेल्या तीन ते चार वर्षांपासून खैरीकडे जाणारा गुंजेवाही-खैरी हा रस्ता पूर्णपणे उखडल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर याच रस्त्यावर असलेल्या पुलांची ही दुरवस्था झाली आहे.
या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी स्थानिकांनी अनेक वेळा केली, परंतू याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे.
रस्ता पूर्ण उखडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परंतु याकडे लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप परिसरातील नागरिक नेहमीच करतात.
रस्ते हे विकासाची नाडी असतात. ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी अत्यंत उत्तम स्थितीत असणे अत्यावश्यक आहे. परंतू नेमके या बाजूने विचार न करता त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. कित्येक दिवसांपासून या भागातील नागरिक या खराब रस्त्यावरून आवागमन करीत आहेत.
एखाद्या ठराविक वेळी एखाद्या लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने रस्त्यास निधी मंजूर झाला तर मोठा गाजावाजा करतात. पत्रक काढतात, वर्तमानपत्रात बातम्या छापून येतात. हे सर्व करून मोठी प्रसिद्धी केली जाते. निधीचे आकडेही लाखो-कोटीत असतात. मात्र, ही ग्रामीण रस्ते दुरुस्त करत असताना थातूरमातूर रस्त्यांची कामे केली जातात व नंतर सहा महिन्यातच रस्त्यांची दुर्दशा होते. असे थातूरमातूर रस्ते करण्यापेक्षा एकदाच संपूर्ण बजेटमध्ये रस्ते दर्जेदार करून दाखवले तर ग्रामीण भागाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी दया दाखवून लवकरात लवकर प्रशासनाच्या मदतीने हा रस्ता बांधुन पूर्ण करावा, असे साकडेचं खैरीसह परिसरातील नागरिकांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना घातले आहेत.