राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी हंसराज अहीर

0
देशाचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी महामहिम राष्ट्रपती यांचे द्वारा निवड करण्यात आली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये हंसराज अहीर यांनी चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे तब्बल ४ वेळा प्रतिनिधीत्व केले असुन केंद्र सरकारच्या सामाजिक हिताशी निगडीत अनेक महत्वपुर्ण समित्यांवर आपल्या संसदीय कारकिर्दीत त्यांनी उल्लेखणीय कार्य केले आहे.

राजकारणाला सामाजिक जोड देत हंसराज अहीर यांनी आपल्या प्रभावी संघटनात्मक कार्यातून ओबीसी, भटके विमुक्त, अल्पसंख्यक समुदायातील मोठ्या वर्गाला भाजपाशी जोडण्याचे भरीव कार्य केले आहे.
आपल्या एकुणच संसदीय कार्यकाळात गरीब, शोषित, प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कामगार व अन्य घटकांच्या सामाजिक उत्थानासाठी विशेष प्रयत्न करित न्याय मिळवून देण्यात अहीर यांचे मोठे योगदान राहीले आहे. भाजपा ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे सांभाळून त्यांनी मागासवर्गीय समाजाला त्यांच्या न्याय हक्काची वेळोवेळी जाणीव करुन देत त्यांचे संघटन उभे करण्यात महत्वपुर्ण कार्य केले. त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्याची तसेच विस्तृत अनुभवाची तसेच प्रत्येक जबाबदारीला न्याय देण्याची क्षमता ठेवणाऱ्या नेतृत्वाची दखल घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली आहे.

हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीबद्दल हंसराज अहीर यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी, प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. यासोबतच केंद्रीय नेतृत्वाने सोपविलेल्या या जबाबदारीला योग्य न्याय देवू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.





Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

All Right Reserved

All Right Reserved Learn More
Accept !